top of page
Writer's pictureYuvana Wellness

Mental Health in COVID-19 epidemic


सर्वे सन्तु निरामयः!

कोरोनामध्ये जपूया मानसिक आरोग्य…..



वर्तमानपत्र असो वा मोबाईल....सगळीकडे एकच चर्चेचा विषय आहे. कोरोना ! बाहेर पडलो वा इतरांच्या संपर्कात आलो तर कोरोना होईल अशी भीती सगळ्यांच्या मनात आहे. बातम्यांतून समजणार्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यांमुळे ती भीती अजूनच बळावत आहे. सुरक्षितता म्हणून गेले काही महिने आपण सगळेच घरात आहोत. अनेक जण घरुन काम करत आहेत तर नुकत्याच लहान मुलांचे शालेय शिक्षणदेखील घरुनच सुरु झाले आहे.


मास्क , सॅनिटायझर, आवश्यक स्वच्छता इतकेच नाही तर शक्य ते घरगुती उपाय करून सर्वजण शारीरिक आरोग्याची काळजी घेत आहेत. परंतु या सर्व परिस्थितीमुळे आपल्या मनात भावनांचा कल्लोळ झाला आहे. भीती, चिंता, अस्थिरता, चिडचिड, राग अशा अनेक भावना अनेक जण अनुभवत आहेत. तर या मनाची काळजी घेण्यासाठी आपण काय करतो ?


शारीरिक आरोग्याप्रमाणेच आपले मानसिक आरोग्य जपणे गरजेचे आहे. सध्या अनेक हेल्पलाईन मानसिक आरोग्यशी निगडीत समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यरत आहेत. नकारात्मक भावनांची झगडताना या हेल्पलाईनद्वारे केले जाणारे मानसशास्त्रीय समुपदेशन उपयुक्त ठरत आहे.


सद्य परिस्थितीत नकारात्मक भावनांसोबत आपण ताणतणावाला सामोरे जात आहोत. तसेच संशोधनातून असे समोर आले आहे की नैराश्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. ताणतणाव व्यवस्थापनाचे प्रत्येकाचे वेगवेगळे उपाय असतात. कोणी कामात मन गुंतवून तर कोणी शांततेत मग्न होऊन ताणापासून मुक्त होतात. परंतु या ताणतणाव व्यवस्थापनापलिकडेही प्रत्येकाचा मूळ हेतू असतो, तो म्हणजे - जीवनातील सकारात्मकता टिकवून आनंदी राहणे!


या आनंदी आणि अर्थपूर्ण जगण्यासाठी सायकाॅलाॅजिस्ट मार्टिन सेलिग्मन यांनी पर्मा (PERMA) नावाचा सिद्धांत मांडला आहे. यामध्ये सकारात्मक भावना ( Positive Emotions), व्यस्तता ( Engagement ), नातेसंबंध ( Relationships), अर्थपूर्णता ( Meaning ), यश (Achievement) असे घटक दिले आहेत. ह्या सर्व घटकांचा एकमेकांशी परस्परसंबंध आहे.या सर्वांचा आधार घेऊन आपण काही गोष्टी आमलात आणू शकतो आणि मानसिक आरोग्याची काळजी घेऊ शकतो.


सकारात्मकता टिकवण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी केल्यावर आनंद मिळतो अशा गोष्टी आपण करू शकतो. उदाहरणार्थ - व्यायाम करणे , पुस्तक वाचणे, स्वयंपाक करणे इ. या गोष्टींमध्ये व्यस्त राहून आनंद मिळू शकतो तसेच अर्थपूर्णता येते. दर दिवसासाठी काही कामे ठरवून घेऊ शकतो, जी पूर्ण झाल्यावर काही साध्य केल्याचे समाधान मिळू शकते.


सध्या सर्वजण घरातच आहेत. रोज तेच ओळखीचे चेहरे पाहून सर्वांच्याच मनात आयुष्यातील नाविन्य संपल्याची भावना येत आहे. इतके दिवस न दिसणारे दोष देखील डोके वर काढत आहेत. अशावेळी नातेसंबंधांत सकारात्मकता टिकून राहण्यासाठी वादात रूपांतरित न होणारा मोजका व आपुलकीचा संवाद होणे गरजेचे आहे.


या पर्मा सिद्धांतासोबतच मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. कोरोनाशी निगडीत बातम्यांमुळे जर नकारात्मक भावना निर्माण होत असतील तर त्या मर्यादित वेळेसच पाहू शकतो. या सर्व परिस्थितीत येणारे विचार व भावना व्यक्त करणे गरजेचे आहे. ज्यांच्याशी बोलून आनंद वाटेल अशा लोकांशी दूरध्वनीद्वारे संपर्कात राहू शकतो. ज्यामुळे एकटेपणाची भावना मनात येणार नाही. तसेच शक्य असल्यास मनातील भावना व विचार लिहील्यास त्याला विशिष्ट स्वरुप प्राप्त होते.


अजूनही समाजात मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे कमकुवतपणाचे मानले जाते. परंतु मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या असल्यास मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत गरज भासल्यास मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधावा.


सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता, नियमांचे पालन यासोबत थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवून तो मानसिक आरोग्यासाठी देऊया आणि ' सर्वेपि सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामयः|' हा मंत्र खरा अर्थाने जगूया.


-कु. आकांक्षा ब्रह्मे


56 views0 comments

Recent Posts

See All

Comments


Post: Blog2_Post
bottom of page